ऑटो रायटींगची सुरवात पेन कागदावर टेकवल्या पासून होते, पण ते पेन जागचे हालता हालत नाही तेंव्हा वाटणारी उत्सुकता, धास्ती व एक प्रकारचे दडपण यातून हळू हळू बाहेर येत मानसिक आंदोलने स्थिर झाली अन् पेन हालले. टेकवल्या जागी टिंबातून पेन गोलगोल वळणे घेत राहिले. बराच वेळ तसेच होत राहिल्यावर त्या गडद टिंबाच्या मधून बाहर सरकून पेन एका दिशेने चालले आहे असा आभास निर्माण झाला. अन टिंबाचे रेषेत रुपांतर झाले. जणू काही रनवे वरील पळणाऱ्र्या विमानाने गती घेऊन अवकाशात जायला झेप घेतली असावी! पेन पानाच्या टोकाला आले की हात आपोआप पुन्हा टिंबाच्या खाली पुन्हा नवी रेष तयार करायला जाऊ लागला. रेषांतून नेटकेपणा येत गेला. मी रेष सरळ यावी असे ही प्रयत्न करत नव्हतो ना वाकडी किंवा खाली जाणाऱ्या रेषांना मुद्दाम पुन्हा वर आणायचा प्रयत्न करत होतो. जणू नुकतेच पावले टाकायला शिकलेले बालक आपल्या मर्जीने पुढे जाते व त्याचा फक्त तोल सांभाळायसाठी जितपत आधार वरिष्ठांना द्वाया लागतो, इतपत माझे त्यावर नियंत्रण होते असे म्हणता येईल. एकक्षण असे वाटले की आता बस. अन् आपोआप पेन हातातून गळून पडले. त्या दिवसाचे लेखन जणू संपलेले होते. पुढच्या दिवशी मी पुन्हा पहाटे उठून डायनिंग टेबलावर एक मेणबत्ती पेटवून तिच्या प्रकाशात वही उघडून बसलो. हात जोडले. डोळे मिटून, मनात प्रार्थना करू लागलो, की हे अवतार मेहेरबाबा, कार्ल, आपण मला वडिलांच्याशी संपर्क करून देऊन ऑटो रायटींग करायला त्यांना प्रेरणा द्या. माझ्या हातून ऑटो लेखन व्हायला मनाचे संतूलन तयार करा. या कलेचा मी गैरवापर करणार नाही. आपले आशीर्वाद असू देत. बराच वेळ गेला आज काही होईल असे वाटत नाही असे काही विचार तरंगू लागले अन पेन हालले. पुन्हा टिंबापासून गोल वर्तुळे झाली अन रेष निघायला सुरवात झाली ती अंमळ झटकन.... चारच रेषात तो बहर ओसरला व पेन गळून घरंगळत टेबलाखाली गेलेेले पाहिले. वही मिटवून मी ऑफिसला जायच्या विचारात गुंतलो. काही काळात पत्नी उठली. मुलांना शाळेत जायला उठवून तयार करायला सरसावली. मी बंगल्याच्या अंगणात आलेल्या पेपरवर नजर टाकत बसे पर्यंत सर्व्हंट क्वार्टर मधून आलेल्या आयाने ट्रेतून चहाचे मग मला व मिसेसला सर्व्ह केला. आज काय अशा प्रश्नार्थक नजरेने विचारत मला ऑटोरायटींगची आठवण करून दिली. आज फक्त पेन हालले. रेषा उमटल्या. असे म्हणताच पाहू कशा म्हणत तिने वहीची पाने उटलटली. मी युनिफॉर्म घालून तयार होऊन कारला सराईतपणे गेट बाहेर काढत हवाईदलाच्या पुणे स्टेशनच्या अकौंट्स सेक्शनकडे मोर्चा वळवला.
91 B क्वार्टरच्या व्हरांड्यातील पहिला चहापानाची तयारी चालू...
Comments
Post a Comment